Thursday, 3 March 2016

शब्द चक्र

✳ शब्दचक्र : या उपक्रमात मध्यभागी एक छोटे वर्तुळ रेखाटून त्याला वर्तुळाच्या कडेपासून बाहेर जाणाऱ्या ८ रेषा समोरासमोर काढाव्यात. या वर्तुळात कोणतेही एक अक्षर लिहून त्यापासून सुरुवात होणारे शब्द त्या ८ रेषांपुढे लिहिण्यास सांगावे. ✳ या उपक्रमातून साध्य होणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे : १)ध्वनिभेद : इयत्ता १ली च्या विद्यार्थ्यांकरिता हा उपक्रम घेऊन त्यांना वर्तुळातील दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द विचारावे. यामुळे मुले त्या अक्षराचा उच्चार होणारेच शब्द सांगतात. चुकून एखाद्या मुलाने दुसऱ्या अक्षरापासून सुरु होणारा शब्द सांगितल्यास त्यांना स्वतःच त्यातील ध्वनिभेद समजतो. २) शब्दचक्र वाचन : इयत्ता २री च्या मुलांसाठी प्रत्येक मुलाला वेगळे अक्षर देऊन त्यापासून त्यांना ८ शब्द असलेले शब्दचक्र तयार करण्यास सांगावे. एकाने दुसऱ्याचे शब्दचक्र वाचावे तर दुसऱ्याने पहिल्याचे शब्दचक्र वाचावे. असे गटात कार्य देऊन वाचन कौशल्याचा विकास घड़वता येतो तसेच शब्द संपत्ति देखील वाढते. ३) शब्दाचा वाक्यात उपयोग : इयत्ता ३री व ४थी साठी याच उपक्रमाचा उपयोग करुन तयार झालेल्या ८ शब्दांचा वाक्यात उपयोग करून ८ वाक्य तयार करता येऊ शकतात. यामुळे दिलेल्या शब्दाची वाक्यात कुठे रचना करावी हे विद्यार्थ्याना समजण्यास मदत होते. ४) गोष्ट तयार करणे : शब्दचक्रातील ८ शब्दांपासून गोष्ट तयार करण्याचा उपक्रम देखील घेऊ शकतो. तयार झालेल्या कोणत्याही शब्दांत सहसंबंध जोडून गोष्ट विद्यार्थी करू शकतात. ५) शब्दांची करामत : हा उपक्रम देखील या शब्दचक्राद्वारे साध्य होऊ शकतो. तयार झालेल्या ८ शब्दांना योग्य "प्रत्यय" लावून शब्द करामतीचे वाक्य तयार होऊ शकते. उदा. कविताने काकाचे कपड़े कपटात कोंबले. ६) यमक शब्द संग्रह : शब्दचक्राद्वारे तयार झालेल्या ८ शब्दांचे यमक विद्यार्थ्याना विचारावे. यातून विद्यार्थी पूर्वज्ञानावर आधारित बरेच यमक शब्द सांगतात. असे अनेक उपक्रम या एका उपक्रमातून घेऊ शकतो. लहान तसेच मोठ्या इयत्तेसाठी देखील हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो .

कथा

✳ कथा तयार करणे : या उपक्रमात विद्यार्थ्याना त्यांचे परिचित असे कोणतेही ३ किंवा ४ शब्द देऊन त्यावर आधारित कथा त्यांना तयार करण्यास सांगावे. ही कथा विद्यार्थी अनुभवावर आधारित असल्यामुळे तिचा स्वीकार आपण करावा. पुरेश्या सरावानंतर अपरिचित शब्द देऊन कथा तयार करण्यास सांगावे. आवश्यक असल्यास अपरिचित शब्दाचा अर्थ एखादे उदाहरण देऊन सांगावा, अर्थ कळल्यास विद्यार्थी कथा तयार करतात. मोठ्या इयत्तेसाठी , या विद्यार्थी निर्मित गोष्टीवर आधारित प्रश्ननिर्मिति करणे, प्रश्नोत्तरे सांगणे , व्याकरणाचा भाग समजावून देणे इत्यादि घटक घेता येतील. उदाहरणार्थ, कुमठे बिटातील राकुसलेवाडी शाळेत आम्ही मुलांना शाम , पाऊस , पुस्तक हे ३ शब्द दिले होते. त्या विद्यार्थ्यानी या ३ शब्दांवरून अर्थपूर्ण गोष्ट तयार केली. त्यानंतर त्या गोष्टीवर आधारित प्रश्ननिर्मिती देखील केली. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर "नाम" आले पाहिजे इतका सोपा नियम लक्षात ठेऊन ती मुले अनेक प्रश्न तयार करत होती. शेवटी त्यांनीच निर्माण केलेल्या कथेत आलेले नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद लिहून दाखवत होती. त्यांनीच निर्माण केलेल्या गोष्टीचा बोध देखील मुले सांगत होती. ✳ या उपक्रमातून पुढील उद्दिष्टये साध्य होतात : १) स्वतःच्या पुर्वज्ञानाचा वापर करून विद्यार्थी कथा तयार करतात. २) दोन भिन्न शब्दांना एखाद्या घटनेचा वापर करून एकाच गोष्टीचा भाग बनवतात. ३) मेंदूची विचार शृंखला विकसित होण्यास मदत होते. ४) कथा अर्थपूर्ण होत असल्यामुळे बोध देखील स्पष्ट करतात. ५) स्वयं निर्मितीचा आनंद विद्यार्थ्याना मिळतो. ६) प्रश्न निर्मिती, कथेवर आधारित प्रश्नोत्तरे, व्याकरण घटक सहजतेने घेता येतो. ७)नवनिर्मितीचा आनंद मुलांना मिळताे . ८) प्रत्येक विद्यार्थी सहभाग घेताे .वेगवेगऴ्या गाेष्टी तयार करण्याचा प्रयत्न करताे.

कविता

✳ कविता तयार करणे :
                        या उपक्रमात वर्गातील फलकाचे उभी रेख आखुन दोन भाग करावेत. एका भागात कवितेचा विषय लिहावा तर दुसऱ्या भागात त्या विषयाला यमक जुळणारे शब्द लेखन करावे. त्या यमक जुळणाऱ्या शब्दांचा वापर करून कवितेच्या ओळी विद्यार्थी सरावाने तयार करतात

. उदाहरणार्थ :
           "झाड" या विषयाचे यमक जुळणारे शब्द विद्यार्थ्याना विचारावेत. जसे, वाढ, पाड, लाड, माड, जाड इत्यादी.
              यावरून विद्यार्थी कवितेच्या ओळी तयार करतात.
      जसे,
          एक होते झाड
           त्याचा केला लाड
               झाडाची झाली खुप वाढ
                   तो झाला माड
                          झाड झाले जाड .
       यापद्धतीने मुले कविता तयार करतात. यात प्रथम एक विषय घेऊन सराव घेऊ शकतो व नंतर दोन विषय घेऊन एक कविता बनवण्याचा सराव घेऊ शकतो.
✳ या उपक्रमातून पुढील बाबी साध्य होतात :
                  १) विद्यार्थी यमक संकल्पना समजून घेऊन अनेक अर्थपूर्ण यमक शब्द शोधतात.
                 २) यमक शब्द वापरून कवितेच्या ओळी तयार करतात.
                ३) शब्दांतील किंवा ओळींतील सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न                 करतात.

                 ४) पुर्वज्ञानाचा वापर करत अत्यंत अलंकारिक कविता तयार करतात. 
     ५) भाषेच्या काव्य प्रकार निर्मितीचा आनंद विद्यार्थ्याना प्राप्त होतो.

                 संकलन
             सतिश मुणगेकर

पात्र संवाद

✴ पात्र संवाद :

                    या उपक्रमात वर्गातील कमीत कमी २ मुले घेऊ शकतो. त्या दोघानाही वेगवेगळे पात्र नावे द्यावीत व त्यांनाच संवाद तयार करून बोलण्यास सांगावे.
                  उदा. २ मुलांपैकी एक मुलाला बेडूक व दुसऱ्या मुलाला चिमणी अशी पात्रांची नावे द्यावीत. त्यांना संवाद तयार करून बोलण्यास सांगावे. 
         जसे, बेडूक : नमस्कार मी बेडूक आहे. 
              चिमणी : नमस्कार मी चिमणी आहे.
              बेडूक : तू कुठे राहतेस?
              चिमणी : मी झाडावर राहते आणि तू
              बेडूक : मी पाण्यात व जमिनीवर.
              चिमणी : तूला उड़ता येते का?
              बेडूक : नाही, तुला पोहता येते?
               चिमणी : नाही.
       इत्यादी. या पद्धतीने सोपे पात्र देऊन सहज असे संवाद मुले तयार करतात.
   ✴ या उपक्रमातून पुढील बाबी साध्य होतात :
        १) मुलांना मनोरंजक पद्धतीने संवाद, संभाषण, नाट्यिकरण व सादरीकरण या बाबींकडे नेता येते.
       २) संभाषण कौशल्याचा विकास साधता येतो.
       ३) एकदा संवाद करता आला की विद्यार्थ्यात आत्मविश्वास वाढतो.
        ४) संबंधित पात्राविषयीच अथवा घटनेविषयीच प्रश्न निर्मिति करण्याचे कौशल्य विकसित होते.
       ५) ठराविक सरावानंतर विद्यार्थी दिलेल्या पात्राचा हुबेहुब आवाज़ काढून नक्कल करण्याचा प्रयत्न करतात.
६) बौद्धिक थकवा दूर करणे व मनोरंजनातून शिक्षण देणे साध्य होऊ शकते.

                
                                    संकलन
        
                                 सतिश मुणगेकर

शब्दांचा डोंगर

रचनावादी प्रसंगोपात उपक्रम - भाषा

✴ शब्दांचा डोंगर :

                    या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रथम एक शब्द दिला जातो. नंतर त्या शब्दास अनुसरन खालील प्रत्येक ओळीत एकेक शब्द / शब्दसमुह क्रमाने वाढवण्यास सांगणे. यावेळी विद्यार्थ्यांकडून खुप मोठ्या शब्दडोंगराची अपेक्षा करु नका. सुरुवातीला 3 ते 4 ओळींचा झाला तरी चालेल. मात्र हळूहळू तो वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
उदाहरणार्थ :
                         आंबा खातो. 
                   रमेश आंबा खातो.
                रमेश गोड आंबा खातो.
            रमेश दररोज गोड आंबा खातो.
     रमेश दररोज हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.
रमेश दररोज सकाळी हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.

✴ या उपक्रमातून पुढील बाबी साध्य होतात :
           १) व्याकरणाचा भाग सहजतेने घेता येतो.
           २) मनोरंजनातून मुले वाक्य तयार करतात.
           ३)आपण सांगितलेले वाक्य मुले लक्षात ठेवतात.
            ४)मुलांच्या शब्दसंपत्तीत वाढ हाेते. 
            ५)बाेली भाषेतील अनेक नवीन शब्द परीचित हाेतात.
            ६) अबाेल व शांत असणारी मुले बाेलतात व आपले विचार
                  मांडतात.
             ७)अपुर्ण गाेष्ट पुर्ण करणे ..अपुर्ण कविता पुर्ण करणे या                               काैशल्यांचा नकळत पणे विकास हाेताे.
           ८) दिलेल्या शब्दांशी सहसंबंध असणारे शब्द शोधण्याची प्रेरणा          मुलांना मिळते.
           ९) मुलांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास होतो.
               
                         संकलन
                   सतिश मुणगेकर

रोमन अंक

तुम्हा सर्वांना मराठी व इंग्रजी  अंक माहिती  आहेतच परंतु  रोमन भाषेत ते कसे लिहितात ते पाहुया.
   1 ----  I
   2 ----  II
   3 ---- III 
   4 ---- IV
    5 ---- V
   6 ---- VI
   7 ---- VII 
   8 ---- VIII
   9 ---- IX
   10 ---- X
------------------------
  20 ---- XX         30 ---- XXX  
 
ता हे लक्षात  ठेवा.    50 --- L ,    100 --- C ,
                                  500 --- D ,   1000 --- M.

ता वेगवेगळ्या  संख्या  कशा लिहितात  ते पहा.
   40 --- XL , 41 --- XLI , 60 --- LX , 70 --- LXX ,                            
  80 --- LXXX  , 90 --- XC, 111 --- CXI , 200 --CC ,

  300 --- CCC , 345 ---CCCXLV,  400 --- CD,  500 -- D ,

  600 -- DC , 700 -- DCC , 800 -- DCCC, 900 -- CM , 

1000 --- M , 1800 -- M DCCC , 2000 --- MM,
  
5000 --- MMMMM .

                                   संकलन
         
                             सतिश मुणगेकर

इंग्रजी खेळ

A --- एरोप्लेन -- विमान उडविण्याची कृती दाखविणे.

B ---  बटरप्लाय -- फुलपाखरु  दोन्ही  हात हलविणे.

C ---  क्यट --मांजराच्या मिशा -- ओठावर दाखविणे.

D --- डॉग -- हाताच्या  बोटाने  डोक्यावर  कान दाखविणे.

E ---  एलिफंट -- हाताने हत्तीची सोंड झुलवणे.

F --- फिश  -- माशाची कृती  हाताने दाखविणे.

G --- गॉगल -- डोळ्यावर चष्मा  -- हाताने कृती दाखविणे.

H --- हेड -- स्वतःचे डोके  खुणेने दाखविणे.

I ---  आय -- स्वतःकडे  बोटाने दाखविणे.

J --- जोकर --विदुषकाच्या टोपीचे हाताने  हावभाव करणे.

L --- लायन --सिंहाचे कान हाताने  कृती द्वारे दाखविणे.

M --- मंकी -- माकडासारखे हावभाव करणे.

N --- नोज -- नाकावर बोट ठेवाणे.

O --- अॉक्स -- बैला सारखी शिंगे डोक्यावर  दाखविणे.

P --- पेन  -- लिहिण्याची क्रिया  दाखविणे.

Q --- क्वेश्चन  प्रश्नचिन्ह हवेत दाखविणे

R ---रेन  -- पाऊस पडण्याची कृती  दाखविणे.

S --- सन --  हवेत मोठा  गोल दाखविणे.

T --- टी -- चहा पिण्याची क्रिया  हाताने दाखविणे.

U --- अंब्रैला छत्री  उघडण्याची कृती दाखविणे.

V  --- व्यन  -- मोटारीचे चाक हाताने  फिरविणे.

W --- व्हीसल -- शिट्टी वाजविण्याची कृती  करणे.

X --- क्रॉस  -- छातीवर हाताची फुली दाखविणे.

Y --- यॉन -- जांभई देण्याची  कृती  दाखविणे.

Z --- झिगझ्यग -- नागमोडी पायवाट हाताने  दाखविणे .

       अशाप्रकारे तुम्ही  सुद्धा तुमच्या  कल्पकतेने खुणा तयार करा .

              संकलन
      तिश मुणगेकर