Thursday, 3 March 2016

कथा

✳ कथा तयार करणे : या उपक्रमात विद्यार्थ्याना त्यांचे परिचित असे कोणतेही ३ किंवा ४ शब्द देऊन त्यावर आधारित कथा त्यांना तयार करण्यास सांगावे. ही कथा विद्यार्थी अनुभवावर आधारित असल्यामुळे तिचा स्वीकार आपण करावा. पुरेश्या सरावानंतर अपरिचित शब्द देऊन कथा तयार करण्यास सांगावे. आवश्यक असल्यास अपरिचित शब्दाचा अर्थ एखादे उदाहरण देऊन सांगावा, अर्थ कळल्यास विद्यार्थी कथा तयार करतात. मोठ्या इयत्तेसाठी , या विद्यार्थी निर्मित गोष्टीवर आधारित प्रश्ननिर्मिति करणे, प्रश्नोत्तरे सांगणे , व्याकरणाचा भाग समजावून देणे इत्यादि घटक घेता येतील. उदाहरणार्थ, कुमठे बिटातील राकुसलेवाडी शाळेत आम्ही मुलांना शाम , पाऊस , पुस्तक हे ३ शब्द दिले होते. त्या विद्यार्थ्यानी या ३ शब्दांवरून अर्थपूर्ण गोष्ट तयार केली. त्यानंतर त्या गोष्टीवर आधारित प्रश्ननिर्मिती देखील केली. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर "नाम" आले पाहिजे इतका सोपा नियम लक्षात ठेऊन ती मुले अनेक प्रश्न तयार करत होती. शेवटी त्यांनीच निर्माण केलेल्या कथेत आलेले नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद लिहून दाखवत होती. त्यांनीच निर्माण केलेल्या गोष्टीचा बोध देखील मुले सांगत होती. ✳ या उपक्रमातून पुढील उद्दिष्टये साध्य होतात : १) स्वतःच्या पुर्वज्ञानाचा वापर करून विद्यार्थी कथा तयार करतात. २) दोन भिन्न शब्दांना एखाद्या घटनेचा वापर करून एकाच गोष्टीचा भाग बनवतात. ३) मेंदूची विचार शृंखला विकसित होण्यास मदत होते. ४) कथा अर्थपूर्ण होत असल्यामुळे बोध देखील स्पष्ट करतात. ५) स्वयं निर्मितीचा आनंद विद्यार्थ्याना मिळतो. ६) प्रश्न निर्मिती, कथेवर आधारित प्रश्नोत्तरे, व्याकरण घटक सहजतेने घेता येतो. ७)नवनिर्मितीचा आनंद मुलांना मिळताे . ८) प्रत्येक विद्यार्थी सहभाग घेताे .वेगवेगऴ्या गाेष्टी तयार करण्याचा प्रयत्न करताे.

No comments:

Post a Comment