Thursday, 3 March 2016
शब्द चक्र
✳ शब्दचक्र :
या उपक्रमात मध्यभागी एक छोटे वर्तुळ रेखाटून त्याला वर्तुळाच्या कडेपासून बाहेर जाणाऱ्या ८ रेषा समोरासमोर काढाव्यात. या वर्तुळात कोणतेही एक अक्षर लिहून त्यापासून सुरुवात होणारे शब्द त्या ८ रेषांपुढे लिहिण्यास सांगावे.
✳ या उपक्रमातून साध्य होणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे :
१)ध्वनिभेद :
इयत्ता १ली च्या विद्यार्थ्यांकरिता हा उपक्रम घेऊन त्यांना वर्तुळातील दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द विचारावे. यामुळे मुले त्या अक्षराचा उच्चार होणारेच शब्द सांगतात. चुकून एखाद्या मुलाने दुसऱ्या अक्षरापासून सुरु होणारा शब्द सांगितल्यास त्यांना स्वतःच त्यातील ध्वनिभेद समजतो.
२) शब्दचक्र वाचन :
इयत्ता २री च्या मुलांसाठी प्रत्येक मुलाला वेगळे अक्षर देऊन त्यापासून त्यांना ८ शब्द असलेले शब्दचक्र तयार करण्यास सांगावे. एकाने दुसऱ्याचे शब्दचक्र वाचावे तर दुसऱ्याने पहिल्याचे शब्दचक्र वाचावे. असे गटात कार्य देऊन वाचन कौशल्याचा विकास घड़वता येतो तसेच शब्द संपत्ति देखील वाढते.
३) शब्दाचा वाक्यात उपयोग :
इयत्ता ३री व ४थी साठी याच उपक्रमाचा उपयोग करुन तयार झालेल्या ८ शब्दांचा वाक्यात उपयोग करून ८ वाक्य तयार करता येऊ शकतात. यामुळे दिलेल्या शब्दाची वाक्यात कुठे रचना करावी हे विद्यार्थ्याना समजण्यास मदत होते.
४) गोष्ट तयार करणे :
शब्दचक्रातील ८ शब्दांपासून गोष्ट तयार करण्याचा उपक्रम देखील घेऊ शकतो. तयार झालेल्या कोणत्याही शब्दांत सहसंबंध जोडून गोष्ट विद्यार्थी करू शकतात.
५) शब्दांची करामत :
हा उपक्रम देखील या शब्दचक्राद्वारे साध्य होऊ शकतो. तयार झालेल्या ८ शब्दांना योग्य "प्रत्यय" लावून शब्द करामतीचे वाक्य तयार होऊ शकते.
उदा. कविताने काकाचे कपड़े कपटात कोंबले.
६) यमक शब्द संग्रह :
शब्दचक्राद्वारे तयार झालेल्या ८ शब्दांचे यमक विद्यार्थ्याना विचारावे. यातून विद्यार्थी पूर्वज्ञानावर आधारित बरेच यमक शब्द सांगतात.
असे अनेक उपक्रम या एका उपक्रमातून घेऊ शकतो. लहान तसेच मोठ्या इयत्तेसाठी देखील हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment