Saturday, 19 March 2016

सूर्यमाला

ओळख सूर्यमालेची सूर्य :- सूर्यमालेतील केंद्रबिंदू. ज्याच्याभोवती सूर्यमालेतील सर्व ग्रह - उपग्रह फिरतात तो सूर्य. सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे. त्याच्या नंतरचा पृथ्वीच्या जवळचा दुसरा तारा जवळपास ४ प्रकाशवर्षे अंतरावरील नरतुरंग ह्या तारकासमुहामध्ये आहे. आपल्या पृथ्वीवरील सजीवांस जीवनावश्यक ऊर्जा सूर्या पासून मिळते. सूर्यमालेतील सर्वात अत्यावश्यक घटक असलेला सूर्य सर्वच बाबतीत मोठा आहे. याचा व्यास साधारण १३, ९२, ००० हजार कि. मी. एवढा आहे. थोडक्यात पृथ्वीच्या आकाराने तो एवढा मोठा आहे की सूर्याच्या व्यासावर १०९ पृथ्वी राहू शकतात. सूर्य प्रामुख्याने हायड्रोजन व हिलीयम ह्या वायूंचा बनलेला आहे. प्रत्येक सेकंदाला हजारो टन हायड्रोजन वायू जळून त्याचे हिलीयम वायूमध्ये रुपांतर होते. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० अंश सेल्सिअस व गाभ्याचे १, ६०, ००० अंश सेल्सिअस इतके आहे. बुध :- सूर्यमालेतील बुध हा सूर्या नंतरचा पहिला ग्रह. हा आकाराने आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे. याचा व्यास ४, ८७८ कि. मी. आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे यास आंतर ग्रह देखिल म्हणतात. म्हणजेच तो सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो. याचा अर्थ तो नेहमीच दिसतो असे नाही. वर्षभरात फक्त काही काळच तो दिसतो. तो देखिल सूर्यापासून दूर असताना, अन्यवेळी सूर्यप्रकाशात लुप्त झाल्यामुळे त्याचे दर्शन होत नाही. या ग्रहावर वातावरण नसल्याने उल्कावर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसतो. या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने यावर वातावरणाचा अभाव जाणवतो. बुध ग्रह साधारणतः ५९ दिवसामध्ये स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यास ८८ दिवस लागतात. सूर्यापासून अत्यंत जवळ म्हणजे फक्त ५७, ९०९१७५ कि. मी. ( 0.38709893 A. U.) अंतरावर असल्याने या ग्रहाचे सूर्याच्या बाजूकडील असलेल्या भागाचे तापमान ४२० अंश सेल्सिअस एवढे प्रचंड असते तर याउलट सूर्याच्या त्याच्या विरुद्ध बाजूकडील तापमान अत्यंत थंड म्हणजेच -२०० अंश सेल्सिअस असते. या दोन्ही तापमानात कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. बुधचा सूर्याभोवतीचा भ्रमणाचा मार्ग हा दीर्घ वर्तुळाकृती आहे. तसेच सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भ्रमणावर मोठा परिणाम होतो. बुधाच्या सूर्यप्रदक्षिणा भ्रमणमार्गामध्ये नेहमीच थोडा थोडा बदल होत असतो. म्हणजेच एकदा एका भ्रमणमार्गावरून फिरल्यावर बुध ग्रह त्या मार्गास सोडून दुसर्‍या मार्गावरून भ्रमण करतो. काही वेळेस बुधाचे सूर्यावरील अधिक्रमण पाहावयास मिळते. अधिक्रमण म्हणजे सूर्य-पृथ्वी यांच्यामध्ये सरळ रेषेत ज्यावेळेस बुध ग्रह येतो त्यावेळेस बुध ग्रहाचा छोटासा ठिपका सूर्य बिंबावरून पुढे सरकताना दिसतो. एका शतकामध्ये बुधाची १३ अधिक्रमणे पाहावयास मिळतात. म्हणूनच हे अधिक्रमण अतिशय दुर्मिळ समजले जाते. बुध ग्रहास एकही चंद्र नाही. याच कारण बहुदा सूर्यापासून त्याचे कमी अंतर असावे. काहीवेळेस पृथ्वीवरून बुधाच्या कलादेखील पाहावयास मिळतात. शुक्र :- सूर्यमालेतील शुक्र हा बुधग्रहानंतरचा दुसरा ग्रह. ह्याचा आकार जवळपास आपल्या पृथ्वी एवढा आहे. याचा व्यास १२, १०४ कि. मी. आहे. या ग्रहास देखिल आंतर ग्रह म्हणतात. कारण हा ग्रह देखिल सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये आहे. याच मुळे हा ग्रह देखिल आपणास फक्त सकाळी किंवा संध्याकाळी दिसतो. या ग्रहावरील वातावरण अतिशय दाट असल्याने सूर्याचा त्यावर पडलेला प्रकाश मोठ्या प्रमाणावर परावर्तित होतो. त्यामुळे शुक्र अन्य ग्रहापेक्षा फारच तेजस्वी दिसतो. शुक्राचा स्वतःभोवती फिरण्याचा काल आणि सूर्याभोवती फिरण्याचा काळ यामध्ये मोठे वैशिष्ट्य जाणवते. शुक्राला स्वतःभोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. म्हणजेच शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे. शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०८, २०८, ९३० कि. मी. ( 0.72333199 A. U.) आहे. शुक्राचा स्वतःभोवती फिरण्याच्या दिशेमध्ये कमालीचे वैशिष्ट्य आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह सारख्या म्हणजेच पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह विरुद्ध म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. याचा परिणाम असा शुक्रावर सूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेकडे उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो. सूर्याभोवती फिरताना त्याच्या सूर्याकडील बाजूचे तापमान सरासरी ७३० अंश असते. शुक्र ग्रहाला बुध आंतरग्रह आहे. शुक्रावरून बुध फक्त सकाळी आणि सायंकाळी दिसू शकतो. शुक्राला देखिल एकही चंद्र नाही. पृथ्वी :- सूर्य मालिकेतील तिसरा ग्रह म्हणजे आपली लाडकी पृथ्वी. या व्यतिरिक्त आणखी दुसर्‍या शब्दांमध्ये वर्णन करायचे म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये आजपर्यंत केलेल्या संशोधनानंतर हे आढळून आले आहे की या ग्रहा व्यतिरिक्त इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठराविक अंतर आणि वातावरण यामुळेच बहुदा या ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण झाली असावी. पृथ्वीचा व्यास १२, ७५६ कि. मी. आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे १४९, ५९७, ८९० कि. मी. ( 1 A. U.) आहे. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीला जवळपास २४ तास लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. यालाच आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वीचा आस तिच्या कक्षाकडे २३. ५ अंशांनी झुकलेला आहे आणि याच अवस्थेत ती स्वतःभोवती आणि सूर्या भोवती प्रदक्षिणा करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतू क्रम सुरू असतात. सूर्या पासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यास साधारणतः ८ मिनिटे लागतात. ( एका सेकंदामध्ये प्रकाश जवळपास ३ लक्ष कि. मी. अंतर पार करतो. ) पृथ्वी वर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. त्यामध्ये थोडा जरी फरक असता म्हणजे पृथ्वी सूर्याच्या थोड्याशा अंतराने जवळ अथवा दूर असती तरी जीवसृष्टी निर्माण झाली नसती. संशोधनाद्वारे आता असे आढळून आले की पृथ्वी ही स्वतःच एक चुंबक आहे व वातावरणामध्ये तिच्याभोवती एक चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक असे जंबुकिरण ( अल्ट्रा वायोलेट ) पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करू शकत नाहीत व ते पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळले जातात. पृथ्वीला एक उपग्रह आहे ज्यास आपण चंद्र म्हणतो. चंद्र :- पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीपासून साधारण ३ लाख कि. मी. अंतरावर आहे. खरेतर चंद्राचाच अर्थ आहे उपग्रह. पृथ्वीप्रमाणे सूर्यमालेतील सुरवातीचा बुध आणि शुक्र सोडला तर इतर सर्व ग्रहांना आपापले चंद्र आहेत. इतर ग्रहांना देखिल चंद्र असल्याचे प्रथम गॅलिलिओला कळले जेव्हा त्याला त्याच्या दुर्बिणीमधून गुरुचे चार चंद्र दिसले. नंतरच्या काळामध्ये दुर्बिणीमध्ये झालेल्या अद्ययावत बदलामुळे मंगळ ग्रहापासून प्लुटो ग्रहापर्यंत सर्व ग्रहांना चंद्र असल्याचे आढळून आले. प्रत्येक उपग्रह त्याच्या मुख्य ग्रहाच्या आकाराने लहान असतो व त्याच्या भोवती फिरत असतो. यालाच त्या ग्रहाचे परिभ्रमण असे म्हणतात. परिभ्रमणाचा काळ तो उपग्रह किती अंतरावर आहे यावर अवलंबून असते. उपग्रह जेवढा दूर तेवढाच त्याला मुख्य ग्रहाभोवती लागणारा परिभ्रमणाचा काळ जास्त व उपग्रह जेवढा जवळ तेवढाच त्याचा परिभ्रमणाचा काळ देखिल कमी. प्रत्येक ग्रहाच्या चंद्राची निर्मिती निरनिराळ्या कारणांनी झालेली असू शकते. चंद्र निर्मितीच्या तीन शक्यता आतापर्यंत शोधण्यात आल्या आहेत. १) मुख्य ग्रहाच्या निर्मितीवेळेस त्यापासून उपग्रहाची निर्मिती २) लघुग्रहांच्या किंवा क्युपरबेल्टच्या पट्ट्यातून गुरुत्वाकर्षणाने एखादा मोठा खडक खेचला जाऊन उपग्रहाची निर्मिती ३) रोश मर्यादा ओलांडल्याने एखाद्या ग्रहाचे तुकडे होऊन उपग्रहाची निर्मिती. उदा. शनीचे काही चंद्र . सूर्यमालेतील फक्त मंगळ ग्रहाचेच चंद्र आकाराने अपवाद वाटतात. कारण त्यांचा आकार इतर ग्रहांच्या चंद्राप्रमाणे गोलाकार नाही. मंगळाचे दोन्ही चंद्र ( फोबॉस आणि डिमॉस ) ओबडधोबड आहेत. त्यांना कुठलाच विशिष्ट आकार नाही. तसेच त्यांचे मंगळापासूनचे अंतर देखिल नियमबद्ध नाही. यावरून असा अंदाज निघतो कि हे चंद्र सुरवातीपासून मंगळाचे उपग्रह नसून मंगळ आणि गुरू यांच्या मध्ये असलेल्या लघुग्रहांच्या पट्ट्यातून गुरुत्वाकर्षणाने खेचले गेले असावेत. नैसर्गिक आणि कृत्रिम उपग्रह - उपग्रह म्हणजे एखाद्या ग्रहाभोवती फिरणारा आकाराने छोटा ग्रह म्हणजेच त्या मुख्य ग्रहाचा चंद्र उपग्रहाचे दोन भाग पडतात नैसर्गिक आणि कृत्रिम. नैसर्गिक उपग्रह आधीपासूनच निसर्ग नियमित नियमांप्रमाणे एखाद्या ग्रहाभोवती फिरत असतात. त्यांच्या ग्रहापासूनच्या अंतरानुसार त्यांचा परिभ्रमण काळ नियमित असतो. सध्याच्या अत्याधुनिक जगामध्ये मानवाने सूर्यमालेचा अभ्यास अधिक सोयिस्कर व्हावा म्हणून अवकाशात कृत्रिम यानं पाठविली आहेत. ही कृत्रिम यानं इतर ग्रहांच्या भोवती ठराविक अंतरावरून फिरून त्या ग्रहाची सविस्तर माहिती व चित्रे पृथ्वीवर पाठवितात. यांनाच कृत्रिम उपग्रह म्हणतात. मंगळ :- सूर्यापासून चौथा ग्रह म्हणजे मंगळ. याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या निम्म्याहून थोडा जास्त म्हणजेच ६, ७९५ कि. मी. आहे. पृथ्वीच्या मानाने हा पहिला बहीर्ग्रह असल्याने आपणास हा ग्रह संपूर्ण रात्रभर देखिल दिसतो. सूर्यापासून याचे अंतर साधारणतः २२७, ९३६, ६४० कि. मी. ( 1.52366231 A. U.) आहे. मंगळाचा देखिल आस सूर्यभ्रमण कक्षेशी २५. १९ अंशांनी कललेला असल्याने मंगळावर देखिल पृथ्वीप्रमाणे उन्हाळा व हिवाळा असे ऋतू अनुभवयास येतात. मंगळाचे सूर्यापासूनचे अंतर हे पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या सुमारे दीडपट आहे. या ग्रहास स्वतःभोवती फिरण्यासाठी २४ तास ३६ मिनिटे लागतात. तर सूर्याभोवती फिरण्यास ६८७ दिवस लागतात. हा ग्रह रंगाने लालसर तांबडा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत. ज्यामधील काही ज्वालामुखी अजूनही कार्यरत आहेत. निरीक्षणाद्वारे मंगळावर कालव्यांच्या खुणा आढळल्या आहेत. ज्यावरून असा अंदाज लावला जातो की पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे व या ग्रहावर देखिल पृथ्वीप्रमाणे सजीव सृष्टी असावी. मंगळावरील ध्रृवीय भागात मोठ्या प्रमाणात गोठलेल्या अवस्थेत बर्फ आढळले आहे. मंगळाच्या सूर्याच्या बाजूने असलेल्या भागाचे तापमान २० अंश तर सूर्याच्या विरुद्ध भागाचे तापमान १८० अंश असते. मंगळाला दोन चंद्र आहेत. जवळच्या चंद्राचे नाव फोबॉस व दूरच्या चंद्राचे नाव डिमॉस आहे. सूर्य मालेतील सर्व ग्रह व त्यांचे चंद्र गोलाकार आकाराचे आहेत, तर फक्त मंगळाचे चंद्र त्यांना अपवाद आहेत. दोन्ही चंद्रांना पद्धतशीर गोलाकार आकार नाही. ते वेडे वाकडे आहेत व त्याचा आकार देखिल फार लहान आहे. फोबॉस मंगळापासून साधारणतः ५, ८८० मैलावर आहे व एक दिवसात तो मंगळास प्रदक्षिणा घालतो. तर डिमॉस मंगळापासून साधारणातः १४, ६०० मैलावर आहे व मंगळाभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास त्यास ३० तास ९८ मिनिटे लागतात. लघुग्रहांचा पट्टा लघुग्रह म्हणजे एक ठराविक आकार नसलेले लहान मोठे दगड गोळे जे मंगळ व गुरू या दोन ग्रहांच्यामध्ये सूर्याभोवती गोलाकार भ्रमण करतात. लाखोंच्या संख्येने सूर्याभोवती भ्रमण करणारे हे लघुग्रह सूर्यापासून साधारण २. ७ खगोलीय अंतरामध्ये भ्रमण करतात. अठराच्या शतकामध्ये जर्मन खगोलशास्त्रज्ञ जोहान बोड याने सूर्यापासून ग्रहांच्या अनुक्रमे अंतरावर एक समीकरण तयार केले, त्यालाच 'बोडचा नियम' असे म्हणतात. यामध्ये सूर्याजवळील सुरवातीचा ग्रह ( ० ) शून्य तर त्यानंतरचा ग्रह ३ व त्यानंतरची प्रत्येक संख्या आधीच्या संख्येच्या दुपटीने ७६८ पर्यंत वाढवत न्यायची, मग त्या संख्येमध्ये ४ ही संख्या मिळवायची व येणार्‍या संख्येला १० ने भाग द्यायचा व शेवटी जे उत्तर येईल ती संख्या त्या ग्रहाचे खगोलीय एककामध्ये सूर्यापासूनचे अंतर असेल. खालील समीकरणावरून 'बोडचा नियम' आपणास कळेल ग्रह बोडचे समीकरण बोडचे उत्तर (खगोलीय एकक) ग्रहांचे सूर्यापासून प्रत्यक्ष अंतर बुध ( ०+४ ) ÷ १० .४ .३८७ शुक्र ( ३+४ ) ÷ १० .७ .७२३ पृथ्वी ( ६+४ ) ÷ १० १.० १.०० मंगळ ( १२+४ ) ÷ १० १.६ १.५२ ? ( २४+४ ) ÷ १० २.८ १.४६ - ५.७१ गुरू ( ४८+४ ) ÷ १० ५.२ ५.२० शनी ( ९६+४ ) ÷ १० १०.० ९.५४ युरेनस ( १९२+४ ) ÷ १० १९.६ १९.१८ बोडचा नियम जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा खगोलशास्त्रज्ञांना असे वाटले की नक्कीच या नियमानुसार मंगळ व गुरू यांच्यामध्ये एखादा ग्रह असावा. १ जानेवारी १८०१ मध्ये ग्युसेप्पी पियाझ्झी ( Giuseppe Piazzi) या इटालियन खगोलशास्त्रज्ञाने सर्वप्रथम लघुग्रहाच्या पट्ट्यातील सर्वात मोठा 'सेरेस' ( Ceres) नावाचा लघुग्रह शोधला. या लघुग्रहाचा व्यास साधारण १००३ कि. मी. एवढा आहे. 'सेरेस' हाच मंगळ व गुरू या दोन ग्रहांमधील ग्रह आहे. असे त्यावेळेस समजण्यात आले, पण लगेचच पुढील वर्षी १८०२ मध्ये ६०८ कि. मी. व्यासाचा अजून एक लघुग्रह सापडला. त्याला 'पलास' ( Pallas) हे नाव देण्यात आले. त्यानंतर १८०७ मध्ये ५३८ कि. मी. व्यासाचा 'वेस्टा' ( Vesta) हा लघुग्रह शोधला गेला. त्यानंतर १८४५ पर्यंत अजून आणखी ५ लघुग्रह शोधण्यात आले. दरवर्षी जवळपास ५ या प्रमाणे १९१० पर्यंत लघुग्रहांची संख्या २५ वर गेली. नंतर हा शोधक्रम वाढत जाऊन आजपर्यंत आपण हजारो लघुग्रह शोधले आहेत. लघुग्रहाचे महत्त्वाचे तीन भाग पडतात. १ ) C-Carbonaceous २ ) S-Silicate ३ ) M-Type १ ) C-Carbonaceous :- हे लघुग्रह गडद काळ्या रंगाचे असून त्यावर पडलेली सूर्यकिरणे फार थोड्या प्रमाणात परावर्तित करतात. या लघुग्रहांना सूर्यमालेतील सर्वात वृद्ध लघुग्रह म्हटले जातात. २ ) S-Silicate :- ह्या प्रकारातील लघुग्रह पहिल्या प्रकाराएवढे गडद नसतात. याचा रंग थोडासा लालसर असून त्यावर पडलेल्या सूर्यकिरणांपैकी १/५ ( एक पंचमांश ) किरणे परावर्तित करतात. सिलिकेट प्रकाराच्या खडकाने बनलेल्या लघुग्रहांमध्ये लोह आणि दगडांचे प्रमाण जास्त आढळते. ३ ) M-Type :- वरील दोन्ही प्रकारच्या मानाने ह्या प्रकारातील लघुग्रह प्रकाशकिरणे जास्त स्वरूपात परावर्तित करतात. ( Nickel-Iron) प्रामुख्याने जस्त व लोह असणार्‍या मोठ्या लघुग्रहांच्या टकरीमध्ये त्यांच्या तुकड्यांपासून अशा प्रकारचे लघुग्रह निर्माण होतात. त्यांना नैसर्गिक रंग असतो तर त्यांच्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आढळून येते. लघुग्रहांच्या निर्मितीवर आतापर्यंत अनेक निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. काहींच्या मते सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळेस या लघुग्रहांची निर्मिती झाली असावी, कारण जरी सर्व लघुग्रहांना एकत्र केले तरी त्यांच्यापासून एखादा मध्यम आकाराचा ग्रह तयार होऊ शकत नाही. तर काहींच्या मते धूमकेतूने त्याच्या मार्गामध्ये सोडलेल्या बर्फ आणि धूळ यामुळे हे लघुग्रह निर्माण झाले असावेत. गुरू :- सूर्यमालेतील पाचवा ग्रह गुरू, गुरू म्हणजे एक श्रेष्ठ स्थान. नावाप्रमाणेच सर्व ग्रहांचा गुरू आहे. कारण त्याचा आकारच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा आहे. त्याचा व्यास साधारणतः १, ४२, ९८५ कि. मी. आहे. दुसर्‍या शब्दांमध्ये सांगायचे तर आपल्या पृथ्वी सारख्या अकरा पृथ्वी या ग्रहाच्या व्यासावर ओळीने सहज बसू शकतील. त्याचे सूर्यापासूनचे अंतर ७७८, ४१२, ०१० कि. मी. ( 5.20336301 A.U.) आहे. बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे ग्रह घनरूप पदार्थांनी बनलेले आहेत. याउलट गुरुचा अंतर्भाग हा द्रवरूप लोखंडाचा आहे व या द्रवरूप चेंडूच्या बाहेरच्या भागात वायूचे दाट ढग आहेत. ह्या ढगांमुळेच गुरुवर आडवे पट्टे दिसतात. ह्या ग्रहाचा पृष्ठभाग वायुरुप असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वादळ होत असतात. ह्याच वादळांमुळे या ग्रहांवर एक मोठा भोवरा निर्माण झाला आहे. ज्याचा आकार पृथ्वीच्या तिप्पट आहे. ज्यास रक्तरंजित लाल ठिपका असे देखिल म्हणतात. प्रचंड आकारामुळे त्याचे गुरुत्वाकर्षण देखिल प्रचंड आहे. इतकेच नाही तर त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग देखिल प्रचंड आहे. स्वतःभोवती फेरा मारण्यास त्यास ९ तास ५० मिनिटे लागतात. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्यास १२ वर्ष लागतात. याचाच अर्थ गुरू दरवर्षी एका राशीमध्ये वास्तव्य करतो. पृथ्वीप्रमाणेच गुरू देखिल एक मोठा चुंबक आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे १६ जुलै १९९४ रोजी शुमेकर लेव्ही-९ हा धूमकेतू या ग्रहावर आदळला. या टकरीत या धुमकेतूचे अनेक तुकडे होऊन ते दूरवर पसरले. ही प्रक्रिया २२ जुलै १९९४ पर्यंत चालू होती. तो धूमकेतू गुरू ऐवजी पृथ्वीवर आदळला असता तर काही क्षणातच पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट झाली असती. इतकी तीव्रता या धूमकेतूमध्ये होती. दुर्बिणीने पाहिल्यास त्याचे चार चंद्र फार सुंदर दिसतात. सर्व प्रथम गॅलिलिओने या चंद्रांना पाहिल्याने यास गॅलिलिओचे चंद्र देखिल म्हणतात. त्यांची नावे अशी आहेत - इयो, युरोपा, गॅनिमेड व कॅलिस्टो. यामधील गॅनिमेड हा तर बुध ग्रहापेक्षा देखिल मोठा आहे. आतापर्यंत गुरू ग्रहाचे ४० चंद्र शोधण्यात आले आहेत. तसेच शक्तिशाली दुर्बिणीने पाहिल्यास या ग्रहा भोवती कडा देखिल आढळून आली आहे. शनी :- सूर्यमालेतील सहावा ग्रह व गुरू नंतरचा सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनी. ह्याचा आकार देखिल प्रचंड आहे. याचा व्यास साधारणतः १, २०, ५३७ कि. मी. इतका आहे. परंतु प्रचंड आकारमानापेक्षा तो जास्त प्रसिद्ध आहे त्याच्या भोवती असलेल्या कड्यामूळे. गुरू ग्रहाप्रमाणेच हा ग्रह देखिल वायूमय बनलेला आहे. स्वतःभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास या ग्रहास साधारणतः १० तास लागतात व सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास २९ वर्ष लागतात. सूर्यापासून हा ग्रह जवळपास १, ४२६, ७२५, ४०० कि. मी. ( 9.53707031 A.U.) अंतरावर आहे. गुरू ग्रहांच्या चंद्राप्रमाणे शनी या ग्रहाच्या कड्यांचे देखिल सर्वप्रथम दर्शन गॅलिलिओने आपल्या दुर्बिणीतून घेतले. प्रचंड आकाराचा असून देखिल याची घनता पाण्याहून कमी आहे. समजा जर एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू लागेल. लहान मोठ्या असंख्य खडकांपासून शनी ग्रहाची कडी निर्माण झाली आहेत. कधी एके काळी शनीच्याच एखाद्या चंद्राचा स्फोट होऊन त्यापासून ही कडी निर्माण झाली असावीत. वस्तुतः या कड्यांची संख्या असंख्य असली तरी प्रामुख्याने या कड्यांची सात निरनिराळ्या कड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अतिशय कमी तापमानामुळे या कड्यांतील सर्व तुकडे बर्फाच्छादित आहेत. या कड्यांची जाडी जवळपास १० ते १५ कि. मी. आहे. शनी ग्रह त्याच्या अक्षाशी साधारण २८ अंशांनी कललेला असल्यामुळेच पृथ्वीवरून आपणास त्याची कडी व्यवस्थित दिसतात. अन्यवेळी पृथ्वी शनीच्या विषुववृत्त पातळीत येते, तेव्हा त्याची कडा जवळजवळ अदृश्य होते व त्याजागी शनीला छेदणारी एक बरीक रेषा आपणास दिसते. शनीला एकूण ३० उपग्रह आहेत. त्यामधील टायटन आकाराने बुध ग्रहा एवढा आहे. शनी हा देखिल एक मोठा चुंबक असल्याचे आढळून आले आहे. परंतु ते गुरू एवढे शक्तिशाली आहे. युरेनस :- सूर्यमालेतील सातवा ग्रह म्हणजे युरेनस. बुध पासून शनी पर्यंत सर्व ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसत असले तरी शनी नंतरचे इतर ग्रह पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता भासते. या ग्रहाचा शोध १३ मार्च १७८१ रोजी विल्यम हर्षल याने लावला. वास्तविक शंभर वर्ष त्याआधी हा ग्रह काही शास्त्रज्ञांनी पाहिला होता. परंतु त्याची नोंद एक तारा अशी केली गेली होती. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः २, ८७०, ९७२, २०० कि. मी. ( 19.19126393 A.U.) आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास या ग्रहास १६ तास लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास ८४ वर्षे लागतात. युरेनसची सूर्यप्रदक्षिणा पश्चिमेकडून पूर्वेकडे असली तरी त्याचे स्वतःभोवती फिरणे मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. याचा व्यास साधारणतः ५१, ११९ कि. मी. आहे. युरेनसचा आस ९८ अंशांनी कललेला असल्यामुळे तो घरंगळत चालल्या सारखा दिसतो. त्यामुळे कधी त्याच्या धृव भागाचे तर कधी विषुववृत्तीय भागांचे दर्शन घडते. अंतराळयानांनी पाठविलेल्या माहितीनुसार या ग्रहाभोवती देखिल शनी ग्रहाप्रमाणे कडे आढळून आले आहे. ही कडा युरेनसच्या केंद्रभागापासून ५०, ००० कि. मी. अंतरावर आहे. पण ही कडा दुर्बिणीतून दिसत नाही. या ग्रहास एकूण १५ चंद्र आहेत. ज्यामध्ये पाच मोठे चंद्र आहेत आणि दहा लहान चंद्र आहेत ज्यांचा शोध अलीकडेच पाठविलेल्या व्हॉएजर या यानामुळे लागला. युरेनस आपल्या कक्षेवरून एका सेकंदाला एक मैल सरकतो. युरेनस भोवती देखिल चुंबकीय क्षेत्र असल्याचे आढळून आले आहे. नेप्च्यून :- सूर्यमालेतील नेप्च्यून हा आठवा ग्रह. या ग्रहाचा शोध ४ ऑगस्ट १९६४ रोजी लागला. हा ग्रह देखिल दुर्बिणीनेच पाहता येतो. नेप्च्यून हा ग्रह युरेनसच्या ही पुढे एक अब्ज मैल अंतरावर आहे. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः ४, ४९८, २५२, ९०० कि. मी. ( 30.06896348 A.U.) आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः १९ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास १६५ वर्षे लागतात. याचा व्यास साधारणतः ४९, ५२८ कि. मी. आहे. अंतराळयानांनी पाठविलेल्या माहितीनुसार या ग्रहाभोवती देखिल कडे आढळून आले आहे. परंतु इतर ग्रहांच्या कड्याप्रमाणे ते गोलाकृती नसून त्याच्या एका ठिकाणी रिकामी जागा आहे. ज्यामुळे ते घोड्याच्या नालेसारखे वाटते. ही कडा दुर्बिणीतून दिसत नाही. नेप्च्यूनचे आकारमान सुमारे युरेनसच्या आकारमानाइतकेच आहे. सूर्यापासून अतिशय दूर अंतरावर असल्याने तेथे कमालीची थंडी आहे. तेथील वातावरण मिथेन या विषारी वायूचे बनलेले आहे. नेप्च्यून ग्रहास एकूण ११ चंद्र आहेत. तसेच या ग्रहास देखिल चुंबकीय क्षेत्र आहे. प्लुटो :- सूर्यमालेतील नववा आणि शेवटचा ग्रह. युरेनस आणि नेप्च्यूनचा शोध लागल्यानंतर त्यांची भ्रमण कक्षा ठरविण्यात आली. गणित शास्त्राप्रमाणे हे दोन्ही ग्रह आपापल्या मार्गावरून जाणे आवश्यक होते. परंतु ते कक्षेच्या थोडे अलीकडे पलीकडे दिसू लागले. तेव्हा या ग्रहांना आकर्षित करणारा एखादा ग्रह कुठेतरी असावा असे शास्त्रज्ञाना वाटले. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आणि प्रयत्नांना गणिताची जोड मिळाल्याने अखेर १८ फेब्रुवारी १९३० साली लुटो या ग्रहाचा शोध लागला. दुर्बिणीनेच हा ग्रह पाहता येतो. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः ५, ९०६, ३७६, २०० कि. मी. ( 39.48168677 A.U.) आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः ६. ५ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास २४८ वर्षे लागतात. शास्त्रज्ञानी केलेल्या आकारमानापेक्षा हा फारच लहान निघाला. प्लुटोचे आकारमान पृथ्वीच्या आकारमानापेक्षा कमी आहे. याचा व्यास साधारणतः २, ३६० कि. मी. आहे. धन्यवाद........!

No comments:

Post a Comment